कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेचे ’मिशन धारावी,आतापर्यंत 40 हजारांहून जास्त लोकांची तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता ‘मिशन धारावी’ हाती घेतले असून त्यासाठी 20 डॉक्टर्स, 50 परिचारिका, 25 इंजिनीअर्स, 40 कर्मचारी आणि 2150 कामगारांची विशेष टीम अहोरात्र कार्यरत आहे. पालिकेची ही टीम संशयित रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, रुग्ण सापडल्यास त्याला रुग्णालयात हलवणे, त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना कोरेन्टाईन करणे, कोरेन्टाईन सेंटर्समधील बेडची उभारणी करणे, कामगारांनामार्फत सील करण्यात आलेल्या तसेच इतर ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे अशी कामे करत आहे. मिशन धारावीअंतर्गत आतापर्यंत 40 हजाराहून जास्त लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत 138 रुग्ण सापडले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत 20 डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, कामगार आणि इंजिनीअर्स अशी 2484 जणांची टीम कार्यरत आहे.  आतापर्यंत 52 हजारांहून जास्त लोकांनां घर आणि कोरेन्टाईन सेन्टरमध्ये कोरेन्टाईन करण्यात आले आहे. राजीव गांधी स्पोर्ट्स संकुलात तयार करण्यात आलेल्या सेन्टरमध्ये 300 जणांना कोरेन्टाईन करण्यात आले असून त्यापैकी 159 जणांना 14 दिवसांच्या कोरेन्टाईननंतर लक्षणे न आढळल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. धारावीच्या पालिका शाळेत कोरोनाच्या हाय रिस्क गटातील संशयित रुग्णांना ठेवण्यात आले असून त्याची क्षमता 700 पर्यंत वाढवण्यात येणार आहे तर राजीव गांधी स्पोर्ट्स संकुलात 300 जणांची क्षमता असून तिथे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धारावीत आतापर्यंत 600 कोरोना चाचण्या करण्यात आल्या तर मिशन धारावी अंतर्गत 223 चाचण्या करण्यात आल्या. यातील 86 रुग्ण हे हाय रिस्क गटातील असून जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

जेवण-औषधांची चोख व्यवस्था

धारावीतील कंटेनमेंट झोनमधील लोकांसाठी तयार जेवण, किराणा आणि औषधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत दरदिवशी 12000 तयार दुपार आणि रात्रीच्या जेवणाचे पॅकेट्स असे 2 लाखांहून जास्त तयार जेवणाचे पॅकेट्स तर 18 हजार किराणा मालाचे पॅकेट्स वितरित करण्यात आले आहेत. 2.86 हजारांहून जास्त किमतीची औषधे देण्यात आली.

होम कोरेन्टाईन व्यक्तींचे बेजबाबदार वर्तन 

कोरोनाने धारावीत नुकताच प्रवेश केला होता त्यावेळी होम कोरेन्टाईनचा शिक्का मारलेल्या व्यक्ती धारावीत रस्त्यावर फिरताना आढळल्या होत्या. अशा व्यक्तींना धारावी पोलिसांनी ताब्यात घेऊन कोरोनासाठी असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका होता.

मरकजमध्ये सहभागी झालेले कोरोनाचे रुग्ण जास्त

धारावीत कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात झाला आहे. यातील बहुतेक रुग्ण हे दिल्लीत मरकजमध्ये सहभागी होऊन परतले आहेत. हे रुग्ण सुरुवातीला स्वतःहून पुढे आले नाहीत. मात्र, पालिका आणि पोलीस प्रशासनाने आवाहन केल्यानंतर ते उपचारासाठी पुढे आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आणि धारावीतील कोरोनाचा प्रसार वाढला.