
लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेची सोय व्हावी यासाठी शासनाने सुरु केलेल्या मोफत धान्य वाटप योजनेत स्वस्त धान्य दुकानदारांचा माजलगाव येथे मनमानी कारभार सुरु असल्याचे चित्र आहे. येथील अनेक दुकाने सकाळी नऊ वाजले तरी बंद असतात. अनेक ठिकाणी नेमून दिलेले शासकीय अधिकारी गैरहजर असतात. तर कुठे धान्य मोजून देण्याऐवजी अंदाजे देण्याचा प्रकार सुरु आहे. तर, सर्व्हर डाऊनच्या नावाखाली ग्राहकांना पावत्या न देण्याचा प्रकार घडत असल्याचं चित्र मंगळवारी दिसलं आहे.
कोरोनाचा फैलाव देशासह राज्यात मोठ्या वेगाने सुरु असल्याने पंतप्रधानांनी मागील महिनाभरापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरु केले आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने देशातील सर्वसामान्यांना माफक धान्य वाटप सुरु केले आहे. काही योजनेतून मोफत तर, अनेकांना सवलतीच्या दरात रेशनचे धान्य वाटप सुरु असल्याने स्वस्त धान्य दुकानासमोर सध्या रांगा लागत आहेत. धान्य देताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेची खबरदारी घेण्यासाठी नियमाचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी धान्य दुकानदारांना दिले आहेत. यासाठी प्रत्येक दुकानावर शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती महसूल प्रशासनाने केली आहे.
असे असताना मात्र माजलगाव शहरासह तालुक्यात स्वत धान्य दुकानदारांची मनमानी सुरु असल्याने अनेक ग्राहकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यात एक दिवसाआड संचारबंदीची सूट असून या अडीच तासाच्या काळात धान्याचे वाटप करणे बंधनकारक आहे. असे असताना मंगळवारी शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन आढावा घेतला असता, अनेक दुकाने सकाळी नऊ वाजले तरी बंद असल्याचे आढळून आले. सुरु असलेल्या दुकानात दुकानदारांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे आढळून आले. काही दुकानदार सर्व्हर डाऊन असल्याच्या नावाखाली ग्राहकांना कोणतीच पावती देत नव्हते. काही दुकानात शासनाचे मोफत धान्य ग्राहकांना मोजून न देता अंदाजे देऊन कमी धान्य देत असल्याचा प्रकार पाहायला मिळाला.
माजलगाव शहरातील मठ गल्लीतील काही दुकान दिवसभर न उघडल्याने वाट पाहून ग्राहकांना हात हालवत परत जावे लागले. याठिकाणी नियुक्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची गैरहजेरी संशय निर्माण करणारी होती तर, स्वस्त धान्य दुकानासमोरी दरफलकही गायब झाल्याचे आढळून आले आहे. अशा मनमानी कारभाराचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे.




























































