
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 18601 वर गेली असली तरी उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी एका दिवसात 705 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या देशवासीयांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, आतापर्यंत रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 572 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. 24 तासांत देशात 1336 नवे रुग्ण आढळले. 47 जणांचा मृत्यू झाला. देशभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 18601 झाली आहे. 603 जणांचा मृत्यू झाला आहे. 3252 रुग्ण आता पर्यंत बरे झाले.यात सोमवारी 705 रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकाच दिवसात रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. हे शुभसंकेत आहेत. देशभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 14.78 टक्क्यांवर गेले आहे. तसेच रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा दर(डबलिंग रेट) 3.4 दिवसांवरून 7.5 दिवसांवर गेला आहे. म्हणजे रुग्ण दुप्पट वाढीचा वेग मंदावला आहे.
सहा दिवसात मोठा दिलासा
गेल्या 24तासांत सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. सहा दिवसातील हे प्रमाण सर्वाधिक आहे.15 एप्रिलला 183 कोरोनाबाधित बरे झाले होते.16 ला 260,17ला 243,18 रोजी 239,19ला 316 तर 20एप्रिलला 705 जण बरे होऊन घरी गेले
आतापर्यंत सर्वाधिक कोरोनामुक्त महाराष्ट्रात
देशात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनामुक्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 572 रुग्ण बरे होऊन घरी परतले.त्यानंतर दिल्ली 431 ,केरळ 408 ,राजस्थान 205 , तेलंगणा 190, उत्तरप्रदेश 140, गुजरात131, मध्यप्रदेश आणि हरियाणामध्ये प्रत्येकी 127रुग्ण बरे झाले आहेत.

























































