
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बेकरी,फरसाण व मिठाई दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा हद्दीत विविध प्रतिबंधात्मक आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व उद्योग व सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांना बंदी घालण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी कालावधी दि.30 एप्रिल 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत घोषित करण्यात आलेला होता.आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग मंत्रालय यांच्याकडील दि.17 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र.१४ (xii) अन्वये बेकरी, फरसाण व मिठाई दुकानांना बंदी घालण्यात आलेल्या उत्पादनांमधून वगळण्यात आलेले होते. तर आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग मंत्रालय यांच्याकडील दि.21 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र.अ(3) अन्वये दि.17 एप्रिल रोजीच्या आदेशामधील मुद्दा क्र.14 (xii) वगळण्यात आल्याबाबत निर्देशीत केलेले आहे.
‘त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बेकरी, फरसाण व मिठाई दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.याचे उल्लंघन करणाऱ्या कोणतीही व्यक्ती वा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.





























































