संचारबंदीच्या काळात सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संचारबंदीच्या काळात सांगली जिल्ह्यात बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मिरज तालुक्यातील बेडग येथे मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण गेणु कारंडे यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर भादंवि संहिता 353 आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी मिरज शहरात एका महिलेला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी दुसरी घटना घडली आहे. मिरज तालुक्यातील बेडग या गावी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. ही मुलगी रात्री लघुशंकेसाठी उठली असता आरोपीने या मुलीला नजिकच्या अंगणवाडीच्या इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचे मोबाईलद्वारे फोटोही काढले. परंतु मुलीने आरडाओरडा करताच आरोपी पळून गेला.

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने या आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आणि विविध कलमांन्वये आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात येईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.