वरळी, लोअर परळ परिसरातील 51 पैकी 19 कंटेनमेंट झोन रद्द, 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या जी-साऊथ म्हणजेच वरळी-लोअर परळ परिसरात कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे 51 पैकी 19 कंटेनमेंट झोन रद्द करण्यात आले आहेत. या भागात गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्रतिबंधित क्षेत्र रद्द केली असली तरी सोशल डिस्टन्स आणि सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याची माहिती सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

पालिका प्रशासनाने वरळी, लोअर परळ परिसरात ‘कोरोना’ रोखण्यासाठी शिस्तबद्ध क्वारेंटाइन, दर्जेदार उपचार, रुग्ण शोधमोहीम, प्रभावी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. या प्रयत्नांना चांगले यश येत असल्याचे शरद उघडे यांनी सांगितले. या विभागात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही याच विभागात सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात आता कोरोना नियंत्रणात आला असला तरी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची, संशयितांची तपासणी वेगात सुरू असून क्वारेंटाइनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, जी-साऊथ विभागात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली असली तरी सुमारे 350 पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. तर आतापर्यंत 118 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या विभागात कोरोनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

या भागातील प्रतिबंध हटवले
जी-साऊथ विभागातील लोढा वर्ल्ड टॉवर, आनंद छाया बिल्डिंग, सतीआकार सोसायटी, सिद्धीप्रभा बिल्डिंग, उत्कर्ष बिल्डिंग, विरा हाऊस बिल्डिंग, शिवकृपा बिल्डिंग, विष्णू ज्योती सदन, लोखंडवाला रेसिडन्सी टॉवर, जरीमरी सोसायटी अशा भागांची कंटेनमेंट झोनमधून सुटका करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही गेल्या 14 दिवसांपासून ज्या इमारतींमध्ये रुग्ण आढळले नाहीत अशी ठिकाणेही कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.