परभणी- कोरोना रुग्णाचा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी शहरात 9 दिवसापूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाचा पहिला स्वॅब अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. येत्या 24 तासात तपासणीसाठी दुसरा स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवार, 16 एप्रिल रोजी पुण्याहून आपल्या बहिणीकडे आलेल्या युवकाचा कोरोना रिपोर्ट तपासणीअंती पॉझिटीव्ह आला होता. यामुळे परिसरासह इतर भाग 3 किमीपर्यंत सील करण्यात आले होते. हा रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यात करोना विषाणूची नागरिकांनी धास्ती घेतली. या रुग्णाच्या संपकात आलेले नागरिक, नातेवाईकाना ताब्यात घेऊन चाचणी करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत.

यातच परभणी जिल्ह्यात एकमेव आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त तरुणाचा पहिला स्वॅब नमुना तपासणी अहवाल रुग्णालय प्रशासनाकडे आज शनिवारी प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच येत्या चोवीस तासात दुसरा स्वॅब नमुना घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागरगोजे यांनी दिली. सध्याचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी दुसऱ्या स्वॅबच्या येणाऱ्या अहवालाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.