
कोरोनाचे पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने रस्ता बंद केल्याचा राग मनात धरून अकरा जणांच्या टोळक्याने कोयता, तलवार आणि रॉडने सहा जणांना बेदम मारहाण केली. यात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना निगडीतील भिमशक्ती चौकात घडली.
संपत घागरमळे, दिलीप दगळगे, अभिजीत मांजरे, सुनील कांबळे, अक्षय वावळे, अशोक वावळे, आकाश वावळे, अजय वावळे, ऋतिक मांजरे, रवि साठे, अवि अवचार (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. रोहित रामदास ताठे (वय 24, रा. भिमशक्ती चौक, निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी परिसरात कोरोनाचे पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने फिर्यादी रोहितचा आत्येभाऊ अजय साळवे याने 24 एप्रिल रोजी परिसरातील रस्ता बंद केला. मात्र, रस्ता बंद केल्याने संपत, दिलीप, सुनील आणि ऋतिक यांनी अजयशी वाद घातला होता. हा राग मनात धरून अकरा जणांचे टोळके 25 तारखेला सायंकाळी कोयता, तलवार आणि रॉडने रोहितसह त्याची आई नीता, आत्या सिंधू गौतम साळवे, आत्ये भाऊ विजू साळवे, चंदा अजय साळवे, शेजारी प्रशांत साळवे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजू साळवे गंभीर जखमी झाला. फौजदार एस. एस. ओहोळ तपास करत आहेत.

































































