दुकानदाराला कारवाईची भीती दाखवून पोलिसानी उकळले पैसे, दोघे पोलीस कर्मचारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किराणा दुकानात गायछाप तंबाखूची विक्री करताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी दुकानदारास कारवाईची भीती दाखवून 5 हजाराची मागणी केली. त्यानंतर दुकानदाराकडून 2 हजार 300 रुपये घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 एप्रिलला ही घटना घडली आहे. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस शिपाई हर्षल मांढरे आणि सागर सूर्यवंशी अशी निलंबित करण्यात आलेल्याची नावे आहेत.

कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू आहे. याकाळात फक्त अत्यावश्यक सेवांची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकलचा समावेश आहे. कात्रजमध्ये खडी मशीन चौकात असलेल्या एका किराणा दुकानात तंबाखू आणि गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती मांढरे आणि सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार दोघेही किराणा दुकानात गेले होते. त्यावेळी त्यांना एका भरणीत तंबाखूच्या पुड्या असल्याचे आढळून आले. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र दोघांनी हा प्रकार कोणालाही न सांगता दुकानदाराकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर एका अनोळखी महिलेच्या माध्यमातून दोघांनी दुकानदाराकडून 2 हजार 300 रुपये घेतले.

त्यानंतर दुकानदाराने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन घटना सांगितली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी चौकशी केली असता दोन्ही कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले असल्याचे निष्पन्न झाले. चौकशी अहवालानुसार पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दोघांकडे खुलासा मागितला. मात्र त्यांनी खुलासा न केल्यामुळे दोघांचे निलंबन करण्यात आले.

एकाच दिवसात कारवाई

पोलिस कर्मचाऱ्यांनी खडी मशीन चौकातील किराणा दुकानदाराकडुन 25 एप्रिल रोजी 2 हजार 300 रुपयांची लाच घेतली. त्यानंतर दुकानदाराने माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी केली. त्याचा अहवाल पोलीस उपायुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार दोघांविरुद्ध एकाच दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात आली.