
पोलीस खात्यात बेशिस्त वागणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना आज परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तडकाफडकी निलंबित केले एवढेच नव्हे तर त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही जारी केले. कामात कसूर केल्याप्रकरणी आणि एकाने बेशिस्तपणा केल्याप्रकरणी त्यांनी तडकाफडकी निलंबनाचे आदेश काढले.
येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांस कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व पोलीस मुख्यालयातील एका कर्मचाऱ्यांस बेजबाबदार वर्तन केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी निलंबित केले आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद रेखाजी राठोड हे 19 एप्रिल रोजी कर्तव्यावर होते. त्यावेळी दोन भिन्न गटातील लोक जखमी होऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी राठोड यांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविले. परंतु ते भिन्न गटाचे असताना सुध्दा रात्रीचे गस्त अधिकारी किंवा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली नाही.
त्यामुळे 20 एप्रिल रोजी त्या दोन गटात पुन्हा मोठ्या स्वरूपाचे भांडण होऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. राठोड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनेची अधिकाऱ्यांना माहिती दिली असती तर दोन्ही गटांना पायबंद घालता आला असता व गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले नसते. त्यामुळेच कर्तव्यात कसूर, बेजबाबदारपणा व नैतिक अधःपतनाचे वर्तन केल्याबद्दल पोलीस अधीक्षक उपाध्याय यांनी त्यांना निलंबीत केले. व त्यांच्या विरूध्द खातेनिहाय प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई ब्रम्हानंद नारायण कोल्हे यांनीही मानोली रस्त्यावरील कैलास पोल्ट्री फॉर्ममधील मजुरांना 12 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता झोपेतून उठवून मी पोलीस अधीक्षकांच्या पथकातील कर्मचारी आहे. पोल्ट्री फॉर्म तपासायचा आहे, असे सांगून रूमची तपासणी केली. त्यांचे हे वर्तन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारे ठरले. इतर ठिकाणी कर्तव्य नाही, याची जाण असून सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बेशिस्तपणाचे वर्तन केल्याबद्दल प्राप्त अहवालानुसार अधीक्षक उपाध्याय यांनी त्यांच्या विरूध्दही मंगळवारी आदेश काढले.
























































