
सद्यपरिस्थिती मध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने महाराष्ट्राबरोबर जगभर थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार व्हावा आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून परभणी जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे सुमारे एक कोटी एक लाख रुपये एवढे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे.
मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या उपस्थितीत परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना पहिल्या टप्प्यात रुपये 91 लाख 67 हजार 364 एवढा आणि दुसऱ्या टप्प्यात रुपये 9 लाख 32 हजार 636 असा एकूण एक कोटी एक लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला. परभणी जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वइच्छेने 750 अन्नधान्य संच, 150 आरोग्य संचाचे वाटप केले आहे.
कोरोना बाधित रुग्ण व नातेवाईक यांना जीवनावश्यक वस्तू व दैनंदिन जीवनाचे वाटप करणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सद्यस्थितीत सुरू आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना मदत निधी देतेवेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

























































