
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असलेल्या पी-उत्तर विभागात पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवण्यात येत आहे. हायरिस्क असलेले आणि संशयितांचे शिस्तबद्ध क्वॉरंटाइन, आवश्यक असणार्यांना सहायक उपचार आणि संपूर्ण वॉर्डमध्ये सुरू असलेल्या निर्जंतुकीकरण मोहीम राबवून कोरोनाला रोखण्यासाठी काम केले जात असल्याची माहिती सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली. यामध्ये ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्यासाठी 39 हजार जणांचे सर्वेक्षण करून तपाससणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या पी-उत्तर विभागात दिंडोशी आणि मालाड पूर्व-पश्चिम परिसराचा समावेश होतो. साडेनऊ लाख लोकसंख्या असलेल्या या विभागात आतापर्यंत 139 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या परिसरात तब्बल 70 टक्के भाग हा दाटीवाटीच्या झोपडपट्टीचा भाग असल्याने पालिकेची चांगलीच कसरत होत आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त कबरे यांनी सांगितले. यामध्ये वस्त्यांबरोबरच शौचालयांचे निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका ज्येष्ठांना जास्त असल्यामुळे संपूर्ण वॉर्डमध्ये 39 हजार वृद्धांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या 14 जणांवर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. दिंडोशी विभानसभा क्षेत्रात आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यामध्ये गरजूंना किराणा पुरवणे, तयार जेवण देणे असेही उपक्रम नियमित सुरू आहेत.
बाराशे कर्मचारी-अधिकारी अहोरात्र झटताहेत
पी-उत्तर विभागात पालिका कर्मचारी, डॉक्टर, नर्स, मेडिकल टीम, स्वच्छता कर्मचारी, निर्जंतुकीकरण कर्मचारी-अधिकारी असे बाराशे कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. यामध्ये मालवणी जलकल्याण येथे 42 क्वॉरंटाइन, एसव्ही रोड एसआरए इमारत 100 क्वॉरंटाइन आणि शिवशाही प्रकल्प येथे 225 क्षमतेची क्वॉरंटाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणी 150 जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून संपूर्ण वॉर्डमध्ये 400 जण होम क्वॉरंटाइन आल्याची माहिती सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.

























































