मराठी माणसाने केलेली मुहूर्तमेढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजू पाटोदकर

म दादासाहेबांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट तयार व प्रदर्शित करुन हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया रोवला. त्यावरच आज आपल्या चित्रपट उद्योगाचे अफाट विश्व उभारले आहे.

शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठय़ा झपाटयाने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय 100 वर्षात संपूर्ण रुजला आणि वाढल. लाखो कुटुंबे या व्यवसायात कार्यरत असून कित्येक कोटय़वधींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अगदी अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनीसुद्धा ही कोटींची उड्डाणे पूर्ण केली आहेत, त्यावरूनच या व्यवसायाची महती व व्याप्ती लक्षात येते.

मुंबईच्या सँडहर्स्ट रोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट पाहताना दादासाहेबांच्या मनात विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले. त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करू लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पहिला आणि चित्रपट निर्मितीची ठिणगी मनात पेटली आणि याच ठिकाणी हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.

मराठी माणूस एकदा मनात आले की मागेपुढे पाहात नाही. वयाच्या 40 व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेतले. त्यासाठी आपली विमा पॉलिसीदेखील गहाण ठेवली. लंडन येथे बायोस्कोप सिने विकली या साप्ताहिकाच्या संपादकांची म्हणजे मि. केप बर्न यांच्याशी त्यांची भेट झाली. दादासाहेबांच्या चित्रपट निर्मितींचा निश्चय बघून ते भारावून गेले. त्यांनी तत्कालीन सुप्रसिध्द चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी दादासाहेबांची भेट करून दिली . त्यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले.

‘राजा हरिश्चंद्र’ हा एक तासाचा चित्रपट दादासाहेबांनी आठ-नऊ महिन्यात पूर्ण केला. पत्नी सरस्वती बाईंची मोठी साथ होतीच. कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळविला.

‘राजा हरिश्चंद्र’नंतर दादासाहेबांनी आपला स्टुडिओ नाशिक येथे स्थलांतरीत केला. त्या ठिकाणी ‘मोहिनी भस्मासूर’ व ‘सावित्री सत्यवान’ हे चित्रपट निर्माण केले. चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच आणखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच चित्रपटांच्या प्रिंट काढणारी मशिनरीची त्यांना गरज भासू लागली. यासाठी 1 ऑगस्ट 1914 रोजी दादासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले.4 ऑगस्टपासून दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे अडचणी वाढल्या. फारसे पदरात न पडता. दादासाहेबांना रिक्त हस्ताने परत यावे लागेल. अर्थात त्यांची चित्रपटनिर्मिती सुरूच होती. 1917 साली ‘लंकादहन’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘लंकादहन’ने त्या काळातील चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. मद्रास येथे या चित्रपटाच्या तिकीट विक्रीची जमा झालेली चिल्लर पोत्यात भरून बैलगाडीतून पोलीस बंदोबस्तात न्यावी लागली. तद्नंतर त्यांनी how films are made (1917), श्रीकृष्ण जन्म (1918), कालिया मर्दन (1919), भक्त प्रल्हाद (1920) हे अविस्मरणीय चित्रपट निर्माण केले.

52 मूकपट, गंगावतरण हा शेवटचा बोलपट, अनुबोधपटांबरोबरच 30 लघुपट यांची निर्मिती दादासाहेबांनी केली. अर्थात, हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱया दादासाहेबांचा अंतिम काळ मात्र कष्टदायक गेला. 16 फेब्रुवारी1944 रोजी नाशिक येथे फाळके युगाचा अस्त झाला.

(लेखक माहिती व जनसंपर्क खात्यात वरि… अधिकारी आहेत)