
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदीअसताना हा आदेश धुडकावत चक्क पोलिसांनीच कायदा मोडला. मात्र सांगलीच्या कर्तव्यनिष्ठ पोलिसांनी कायदा सर्वांना समान असतो याचा प्रत्यय दाखवून देत पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना पुन्हा मुंबईला रवाना केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पुणे -बंगळूरू महामार्गावरील कासेगाव चेकपोस्टवर कासेगाव पोलिसांचे पथक कार्यरत होते. यावेळी मुंबईहून सांगलीकडे निघालेली मोटार पोलिसांनी चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना न जुमानता मोटार सांगलीच्या दिशेने निघाली. कासेगाव पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला. शेवटी नेर्ले येथे महामार्गावरच पोलिसांची जीप आडवी मारून ही मोटार थांबवण्यात आली. या मोटारीतून मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे, वरळी वाहतूक विभागाकडील पोलीस नाईक संतोष किसन जाधव व त्यांच्या कुटुंबातील हर्षदा संतोष जाधव व सोहिनी रवी जाधव हे सर्वजण सांगलीस येत होते. जिल्हा बंदीचा भंग केल्याबद्दल त्यांच्या विरोधात कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या सर्वांना पुन्हा मुंबईकडे पोलिसांनी रवाना केले.



























































