नसिरुद्दीन शहा यांची प्रकृती गंभीर? वाचा काय म्हणाला त्यांचा मुलगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी इरफान खान आणि गुरुवारी ऋषी कपूर अशा दोन दिग्गज कलाकारांचे निधन झाल्यामुळे फक्त बॉलिवूडलाच नाही तर संपूर्ण देशाला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यातच गुरुवारी रात्रीपासून ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांची प्रकृती ठिक नसल्याचे मेसेज फिरु लागल्याने सर्वांच्या मनात एक धडकीच भरली.

दरम्यान हे सर्व मेसेज म्हणजे अफवा असल्याचे समोर आले आहे. नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहा याने ट्विटरवरून त्याच्या वडिलांची तब्येत ठिक असल्याचे सांगितले आहे. ‘सर्व काही ठिक आहे. बाबा ही अगदी ठिक आहेत. त्यांच्या तब्येतीबाबतचे सर्व मेसेज खोटे आहेत. इरफान भाई व चिंटूजी यांच्यासाठी प्रार्थना करतोय. खूप आठवण येतेय त्यांची. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात सहभागी आहे. हे आपल्या सर्वांचे खूप मोठे नुकसान आहे’, असे ट्विट विवानने केले आहे.

त्यानंतर नसिरुद्दीन शहा यांनी देखील त्यांना काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले. ‘मी त्या सर्वांचा आभारी आहे ज्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. मी ठिक आहे. माझ्या घऱी असून लॉकडाऊनचे पालन करत आहे. त्यामुळे कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका’, अशी पोस्ट शहा यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.