अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुंगधी तंबाखूची वाहतूक, 15 लाखांच्या मुद्देमालासह दोघे जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली टेम्पोतून टरबुजाखाली सुंगधी तंबाखू लपवून विक्री होत असल्याचे नगर येथे उघड झाले. पोलिसांनी वाहतूक होत असणारा 15 लाख 54 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काटवन खंडोबा रोडवर ही कारवाई केली.

रमजान मन्सूर पठाण (वय 28, रा. संजयनगर, नगर), अयाज इस्साक बागवान (वय 39, गाझीनगर, काटवान खंडोबा रोड, नगर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगर शहरातील काटवन खंडोबा रोडवर सापळा लावून टाटा 909 टेम्पो (एमएच 04, डिके 5268) पकडण्यात आला. टेम्पोची तपासणी केली असता, 9 हजार रुपयांच्या 1 किलोच्या टरबुजाखाली 9 लाख 45 हजार रुपयांची सुंगधी तंबाखू प्रत्येकी 10 किलो वजनाच्या 105 बॅग आढळून आल्या. असा टेम्पोसहित 15 लाख 54 हजाराचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

पकडण्यात आलेल्याकडून पोलिसांनी माहिती घेतली असता, तंबाखू ही जुबेर (संभाजीनगर) याच्याकडून विकत आणल्याची माहिती दिली. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. मुद्देमाल जप्त करून कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.