खडकीतील 4 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मिळाला डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खडकी कँन्टोन्मेंट हद्दीतील 4 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने ते शुक्रवारी घरी परतले आहेत. कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्यावतीने आणि नागरिकांच्यावतीने फुलांचा वर्षाव करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. खडकी परिसरात 21 कोरोनाचे रुग्ण असून त्यातील 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत 14 रुग्ण लवकरच घरी परततील अशी आशा कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आली.

खडकी बाजार परिसरातील 4 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. सिंहगड रस्त्यावरील नवले हॉस्पिटल येथे त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारांतर्गत त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले. या दिलासादायक घटनेनंतर खडकीकर नागरिकांनी त्यांचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला. रुग्ण राहत असलेल्या परिसरात त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक आले होते. आमदार सिध्दार्थ शिरोळे, खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, सदस्य कमलेश चासकर, मनीष आनंद, कँन्टोन्मेंट रुग्णालयाचे डॉ.रणजित भोसले यासह कँन्टोन्मेंट बोर्ड आधिकारी कर्मचारी आदींनी उपस्थित राहून कोरोनावर मात करीत घरी परतलेल्या 4 जणांचे टाळ्या वाजवत फुलांचा वर्षाव करुन स्वागत केले.