
लॉकडाऊन देशात कायम असलं तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळं तेलंगणात अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार मजूर आज चंद्रपूर जिल्ह्यात आले. तेलंगणा सरकारनं या मजुरांना जाण्याची परवानगी तर दिली, मात्र वाहनांची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळं पदरचे पैसे खर्च करून या मजुरांनी भाड्यानं वाहनं केली आणि सीमेपर्यंत आले. गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा पुलावरून हे सर्व मजूर आज महाराष्ट्रात म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले.
मिरची तोड करण्यासाठी करण्यासाठी तेलंगणात हजारो मजूर दरवर्षी जातात. पण यावेळी कोरोना संकटामुळं ते चांगलेच अडचणीत सापडले. या लोकांना गावाबाहेर राहावं लागलं. लहान-लहान मुलं घेऊन या लोकांनी दीड महिना तेलंगणात कसातरी घालवला. आता आपल्या राज्यात परतल्यावरही त्यांच्या यातना कमी होताना दिसत नाही. टळटळीत उन्हात हे लोक डोक्यावर ओझं आणि खांद्यावर मुलांना घेऊन पायदळ आपल्या गावाकडे निघाले आहेत. उन्हापासून बचावासाठी झाडाखाली, रस्त्यावरच्या बसस्थानकात आश्रयाला आहेत. त्यांना स्वागवी पोचवण्याची कोणतीही व्यवस्था राज्य शासन किंवा प्रशासनानं केलेली नाही. एकीकडे राजस्थानातून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बस पाठवण्यात आल्या. मात्र या गरिबांना वाऱ्यावर सोडून एकप्रकारे पक्षपात केल्याचं दिसून आलं. असे अनेक मजूर-कामगार तेलंगणातून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले असून, सीमेवर मदतीची वाट बघत आहेत. राज्यातील सुमारे 25 हजार मजूर तेलंगणात गेलेले आहेत. आणि आपल्यापरीनं ते येत आहेत. दरम्यान, भुकेनं व्याकुळ या लोकांना पोडसाचे उपसरपंच देविदास सातपुते यांनी जेवणाची व्यवस्था केली आणि गावातील एक सभागृह विश्रांतीसाठी उपलब्ध करून दिलं.
































































