मॅगीला ‘मॅगी’ हे नाव कसे मिळाले? यामागे आहे 123 वर्ष जुना इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टू मिनिट नूडल्स’ म्हणून ओळखली जाणारी मॅगी आज जगभरात प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानातही मॅगी खूप लोकप्रिय आहे. ज्यांना स्वयंपाक करता येत नाही, अशांनाही मॅगी सहज बनवता येते. मात्र तुम्हाला माहित आहे का, जी मॅगी आपल्याला इतकी आवडते. त्याचा इतिहास काय आहे? मॅगीला ‘मॅगी’ हे नाव कसे मिळाले? आज आम्ही तुम्हाला याच 123 वर्ष जुन्या इतिहासाबद्दल सांगणार आहोत.

हिंदुस्थानात मॅगीची सुरुवात 1983 साली झाली. नेस्ले इंडिया लिमिटेडने हिंदुस्थानात मॅगी नूडल्स लॉन्च केले होते. मात्र त्याआधी मॅगी परदेशात खूप लोकप्रिय झाली होती. जर्मनी मध्ये 1897 मध्ये प्रथम मॅगी नूडल्स लॉन्च करण्यात आले होते. स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या ज्युलियस मायकल मॅगी यांनी मॅगीची निर्मिती केली आहे. त्यांच्याच नावावर मॅगीचे नाव ठेवण्यात आले आहे. मॅगी बनवण्यामागची कहाणीही खूप रंजक आहे. ज्युलियस यांनी 1884 साली पीठ उत्पादनांची विक्री करण्यास सुरवात केली. मात्र त्याचा व्यवसाय हवा तसा चालत नव्हता. यानंतर 1886 साली त्यांना एक विचार आला की, एका असा पदार्थ बनवायला हवा, जो त्वरीत शिजवून खाता येईल. येथूनच मॅगीची सुरुवात झाली.

ज्युलियस यांच्या मॅगीने हळू-हळू बाजारात आपली ओळख निर्माण केली. त्यावेळी स्वित्झर्लंडच्या सरकारनेही या कामात त्यांना मदत केली. मॅगी व्यतिरिक्त, ज्यूलियसने बाजारात विविध प्रकारचे चवदार सूप आणले आणि ते सर्व खूप लोकप्रिय झाले होते. साल 1912 पर्यंत ज्युलियस यांच्या मॅगीने बनवलेल्या उत्पादनांनी अमेरिका आणि फ्रान्ससारख्या बर्‍याच देशात आपली छाप पाडली होती. त्यांच्या मृत्यूनंतर साल 1947 मध्ये नेस्ले कंपनीने ‘मॅगी’ची खरेदी केली. त्यानंतर मॅगी हिंदुस्थानात ही लॉन्च झाली.