किम जोंग दिसल्यानंतर उत्तर आणि दक्षिण कोरियात तणाव; सीमेवर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा आणि क्रूर हुकूमशहा किम जोंग उन याच्या मृत्यूबाबतच्या अनेक अफवा गेल्या काही दिवसांपासून फिरत होत्या. मात्र, किम सुखरूप असल्याचे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले होते. आता किम दिसल्यानंतर आणि त्याच्याबाबतच्या अफवांना पूर्णविराम मिळाल्यानंतर आता दक्षिण आणि उत्तर कोरियातील तणाव उफाळून आला आहे. उत्तर कोरियाच्या सैनिकांनी आमच्या सीमेवर रविवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केल्याचे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले. तणाव वाढू नये, यासाठी उत्तर कोरियाशी संपर्क करण्यात येत असल्याचे दक्षिण कोरियाने सांगितले.

दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी 2018 पासून दोन्ही देशांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशात शांतता होती. त्यानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच दोन्ही देशात तणाव उफाळला आहे. रविवारी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर गोळीबार केला आहे. याआधी सीमाभागत दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये बाचाबाची होत होती, सीमाभागत शांततापूर्ण तणाव होता. मात्र, दोन वर्षात कोणतीही गोळीबाराची किंवा हल्ल्याची घटना घडली नव्हती. मात्र, उत्तर कोरियाने गोळीबार करून दोन्ही देशातील शांतता भंग केल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सुरक्षा चौक्यांना लक्ष्य करत हा गोळीबार केला. यात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दक्षिण कोरियाकडून चिथावणी देण्यात आल्यानंतर गोळीबार केल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे.

किंमजोंग उन सुमारे 20 दिवसानंतर जगासमोर आला आहे. या काळात त्याच्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे तो समोर आल्यानंतरच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर गोळीबार केला आहे. त्यामुळे या घटनेमागे किमचा हात असण्याची किंवा त्याचे निर्देश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने दोन्ही देशातील तणाव आगामी काळात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.