
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा प्रभाव क्रीडा क्षेत्रावरही पडला आहे. यामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत, तर काही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून एकही मोठी क्रिकेट स्पर्धा झालेली नाही. याचा सर्वाधिक तोटा गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अधिक होईल, असे मत टीम इंडियाचा उपकर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे.
लॉकडाऊननंतर फलंदाजांना मैदानावर पुनरागमन करणे सोपे असणार नाही, असे रोहित शर्मा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसोबत व्हिडीओ चॅट दरम्यान म्हटले. फलंदाजांना आपली लय आणि टायमिंग पुन्हा साध्य करण्यासाठी साधारण दीड महिना लागू शकतो. फलंदाजांसाठी डोळे आणि हात यांच्यातील समन्वय महत्वाचा असतो. त्यामुळे चेंडूच्या वेगाशी ताळमेळ बसण्यास वेळ लागेल, असे रोहित म्हणाला.
शमीशी बोलताना रोहित म्हणाला, गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे आव्हानात्मक असणार आहे. कारण फलंदाजांना सरावासाठी अधिक वेळ लागतो. क्रिकेट बंद असल्याने ते बऱ्याच काळापासून मैदानापासून दूर आहे. या दरम्यान त्यांनी क्वचितच बॅट हाती घेतली असेल. त्यामुळे त्यांना मैदानावर पुनरागमन करणे थोडे कठीण जाईल.
रोहितच्या या मताशी शमी देखील सहमत दिसला. लॉकडाऊन असतानाही गोलंदाज आपल्या वर्कआउटवर लक्ष केंद्रित करत आहेत. सराव सुरू आहे, यामुळे पायही मजबूत राहतात. कोरोनानंतर क्रिकेट सुरू झाल्यावर गोलंदाजांना फक्त मनगटाच्या योग्य पोझिशनवर काम करावे लागेल. आणि यासाठी फलंदाजांपेक्षा कमी वेळ लागेल, असे शमी म्हणाला.

























































