
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या चार झाली आहे. रुग्णांमध्ये एकही सिंधुदुर्गवासीय नाही. रुग्णांमध्ये मुंबईसारख्या रेड झोनमधून आलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे 80 टक्के जनतेने घरात बसून प्रशासनाला सहकार्य केले आहे, त्यांचा विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा ही 80 टक्के जनता प्रशासनाला दोष देईल, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या डीपीडीसी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, नागेंद्र परब, संदेश निकम आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी रेड झोन, कंटेंटमेंट झोनमधून येणाऱ्या नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत. तसेच आंबा मालकांनी जिल्हाधिकारी यांनी बनविलेल्या नवीन नियमावलीचे पालन केले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येवर बोलताना सामंत यांनी, चार बाधितांमध्ये घरात राहून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या 80 टक्के नागरिकातील एकही नाही. तर मुंबई सारख्या रेड झोनमधून आलेल्या व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. आपल्याकडे रेड झोनमधील नागरिकांना प्रवेश नाही. तरीही या झोनमधून नागरिक परतत आहेत. त्यामुळे याचा विचार रेड झोनमधून येणाऱ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
परजिल्हा अथवा परराज्यात जाण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते का, असा प्रश्न जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना विचारला असता त्यांनी यासाठी लिंक तयार केली आहे. ही लिंक भरण्यासाठी किंवा आपला अर्ज मंजूर झाला की नाही, याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना रुग्णालय परिसरात सेवा कालावधीत घर देण्याचे आदेश दिले आहेत. सेवा देणारी व्यक्ती दररोज घरी गेल्याने त्यांच्या कुटुंबांला धोका पोहोचू शकतो. तरीही जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था करण्यात आली नसल्याकडे मंत्री सामंत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चाकुरकर प्रधान सचिवांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिले.




























































