कोरोना रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करा; गटनेत्यांच्या बैठकीत महापौरांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 हजारच्या पुढे गेली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा आणखी वाढला तर खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अॅक्शन प्लॅन तयार करावा, असे आदेश शुक्रवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना दिले. रुग्णालयातील बेड फुल झाले आहेत, अशी अयोग्य माहिती देत रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

मुंबईत कोरोना रुगांची संख्या वाढत असून पुढे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत काही खासगी रुग्णालये पालिकेची दिशाभूल करत आहेत. पालिकेच्या नियमानुसार खासगी रुग्णालयात गरिबांसाठी 20 टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, रुग्णांमुळे बेड फूल असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे खासगी रुग्णालयात यापुढे पालिकेतील एका अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर काही खासगी रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. ती सुरू करण्याच्या सूचना देऊनही बंद आहेत. अशा खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देशही महापौरांनी दिले. रुग्णालयांबाहेर पुरेशा रुग्णवाहिका असाव्यात तसेच क्वारंटाईन आणि प्रतिबंधित क्षेत्राची माहिती वेळोवेळी गटनेत्यांना द्यावी, अशी सूचनाही केली. बैठकीला सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यासाठी स्वतंत्र शवगृह
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाणही वाढत आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळा नातेवाईक लवकर येत नाहीत किंवा येतच नाही. त्यामुळे शवगृहात मृतदेह पडून राहतात. त्यांची लवकर विल्हेवाट लावावी, तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शवगृहाची व्यवस्था करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.