
बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मेळघाटात वन्यप्राण्यांची गणना 6 व 7 मे रोजी मध्यरात्री करण्यात आली आहे. त्यानुसार मेळघाटात 17 हजार 185 प्राण्यांची नोंद करण्यात आली असून त्यात 35 वाघांचा समावेश आहे. वाघ्र प्रकल्पातील वन अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय वनकर्मचारी आणि मजूर यांच्या उपस्थितीत ही गणना करण्यात आली आहे, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी दिली. विशेष म्हणजे यावर्षी लॉकडाऊनअसल्यामुळे पर्यटक,प्राणीप्रेमी आणि अभ्यासक वन्यजीवगणनेसाठी उपस्थित नव्हते. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, लॉकडाऊन असल्याने कोणालाही सहभागी करणे शक्य नसल्याचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.
यावर्षी झालेल्या वन्यजीव गणनेमध्ये 35 वाघ, 40 बिबटे, 340 अस्वल, 172 रानकुत्रे, 752 गवे आणि मोठ्या प्रमाणात भक्ष्य आणि इतर प्राणी आढळून आले आहेत. वाघ्य्रप्रकल्पातंर्गत येणाऱ्या सीन विभागात 140, गुगमलमध्ये 95, अकोटमध्ये 140 तर मेळघाट बफर झोनमध्ये 58 मचाण उभारण्यात आल्या होत्या,
अशी माहिती रेड्डी यांनी दिली.
दरवर्षी या उपक्रमामध्ये वन्यजीव प्रेमींना सहभागी होता येते. या निसर्ग अनुभवाची प्रेमी उत्कंठेने वाट पाहत असतात. मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू, अमरावती अकोला इत्यादी ठिकाणाहून निसर्गप्रेमी या गणेनेला उपस्थित राहून पर्वणीचा अनुभव घेतात. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने केवळ वनविभागातील कार्यरत अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इतर अशासकीय संस्था, निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी, अभ्यासक यांना यावर्षी वन्यजीव गणनेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.




























































