भटकंती – सेंटिनल बेटावरील आयसोलेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुलीप तु. डुंबडे

सेंटिनल बेटावर फक्त सेंटिनलीज जमातीचे राज्य आहे. त्यांना दुसऱ्या कुणाशीही संबंध ठेवायचा नाही. आज आपल्याकडे गावागावात कोरोनामुळे असेच चित्र पाहायला मिळत आहे. गावकऱयांनी आपल्या गावाच्या सीमा बाहेरून येणाऱया लोकांसाठी बंद केल्या आहेत. सेंटिनल बेटावर कोरोनाची साथ नसली तरी तेथील सेंटिनलीज ही आदिवासी जमात ‘आयसोलेशन’मध्ये शतकानुशतके राहत आहे. त्यांच्या बेटाच्या सीमा त्यांनी इतरांसाठी अगोदरच बंद केल्या आहेत. कोरोना आता आला, त्यामुळे जगभरात आयसोलेशनची लाट आली. सेंटिनल बेटावर मात्र हजारो वर्षांपासून ‘आयसोलेशन’ हेच तेथील आदिवासी जमातीचे जीवन आहे.

स ध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशन, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाइन, लॉकडाऊन हे परवलीचे शब्द झाले आहेत. गेल्या महिना-दीड महिन्यापासून लोकांना घरात बसावे लागल्याने त्यांची अस्वस्थता वाढू लागली आहे. त्याचेच पर्यवसान म्हणून मग कुठे पोलिसांवर हल्ले, कुठे चोर समजून साधूंवर हल्ले, तर कुठे अचानक एखाद्या रेल्वे स्टेशनला एकत्र जमून हंगामा करणे अशा घटना घडत आहेत. परंतु जगाच्या पाठीवर अशा काही मोजक्या जमाती आहेत की, ते हजारो वर्षांपासून आयसोलेशनमध्येच राहतात. बाह्यजगाशी त्यांचा काडीचाही संबंध नाही. अशीच एक जमात आहे ‘सेंटीनलीज’. हिंदुस्थानच्या मुख्य भूमीपासून सुमारे 1300 किमी दूर अंदमान-निकोबार द्वीपसमुहातील उत्तर सेंटिनल बेटावर ही जमात राहते.

आकाशातून पाहिले तर निळेशार पाणी, शुभ्र वाळू व घनदाट जंगलाचे आच्छादन असलेले हे बेट वरवर पाहता अगदी स्वर्गच असल्याचा भास होतो. याच ठिकाणी ही सेंटिनलीज आदिवासी जमात राहते. अर्थात ही सेंटिनलीज जमात पृथ्वीवरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखली जाते. त्यांना त्यांच्या जीवनात बाह्य जगातील कोणाचाही हस्तक्षेप मान्य नाही. तरीही कोणी येथे जाण्याचे साहस केलेच, तर त्यांचे स्वागत ही जमात बाणांच्या व भाल्यांच्या वर्षावानेच करते. हे लोक त्यांची हत्या करतात. अशा अनेक घटना तेथे घडल्या आहेत. असे सांगितले जाते की, आफ्रिकेतून या बेटावर स्थलांतरित झालेली ही जमात सुमारे 50 ते 60 हजार वर्षांपासून येथे राहत आहे. ही एक अश्मयुगीन जमात आहे. आजच्या अंतरिक्ष युगात पृथ्वीवर एक अश्मयुगीन जमात राहते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

अंदमान निकोबार बेटांवर सेंटिनलीजशिवाय जारवा, ग्रेट अंदमानी, ओग्न, सौपेंज या जमातीही राहतात. 1956 मध्ये हिंदुस्थान सरकारने या पाच जमातींना मूळ आदिम जमातींचा दर्जा दिला आहे. सद्यस्थितीत त्यांची संख्या 250 ते 400 च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे, तर सेंटिनलिजची संख्या 50 ते 150 असावी असे सांगितले जाते. परंतु चिंतेची बाब म्हणजे या जमातीची लोकसंख्या झपाटय़ाने कमी होत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सेंटिनलीज लोकांची 10 घरे असून 13 पुरुष आणि स्त्रिया असे 15 लोकच तेथे राहत असल्याची नोंद हिंदुस्थान सरकारने केली आहे.
सेंटिनलीज लोकांची फारच कमी माहिती उपलब्ध आहे. हे लोक मासेमारी व शिकार करून जगतात. ते आजही एवढय़ा प्राथमिक अवस्थेत आहेत की, त्यांना साधी शेतीसुध्दा माहीत नाही. या लोकांशी कोणत्याच प्रकारचा संबंध स्थापित होऊ न शकल्याने त्यांच्या भाषेबद्दलही काहीच माहिती नाही.

1980 मध्ये ब्रिटिशांनी या जमातीचा अभ्यास करण्यासाठी येथील दोन प्रौढ व दोन मुलांना पळवून नेऊन पोर्ट ब्लेअरला ठेवले. परंतु दुसऱया प्रदेशात गेल्याने ते आजारी पडले आणि त्यातच दोन्ही प्रौढ सेंटिनलीजचा मृत्यू झाला, तर ती मुलेही मरणासन्न अवस्थेत असल्याने ब्रिटिशांनी त्यांना पुन्हा त्यांच्या बेटावर नेऊन सोडले. तेव्हापासूनच ही जमात अधिक हिंस्र झाली व बाह्य जगातील लोकांना ते दुश्मन समजू लागले असे सांगितले जाते.

प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ टी. एन. पंडित हे काही काळ या जमातीसोबत राहून आले आहेत. त्यांनी या जमातीचा अभ्यास केला आहे. त्यांनी आपला अनुभव बीबीसीलादेखील सांगितला आहे. ते म्हणतात, ‘सेंटिनलीजचे शरीर अतिशय संवेदनशील आहे. जर बाहेरचे लोक त्यांच्या संपर्कात आले तर ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. कारण इतर जगापासून विभक्त राहिल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती प्रगत जगास अनुसरून विकसित झालेली नाही. त्यामुळे साधा ताप, सर्दीसारख्या आजारानेही या संपूर्ण जमातीचा निर्वंश होऊ शकतो.’

2004 च्या त्सुनामीनंतर या जमातीच्या मदतीसाठी हिंदुस्थानी कोस्ट गार्डचे एक हेलिकॉप्टर येथे पाठविण्यात आले होते. परंतु या लोकांनी त्या हेलिकॉप्टरवर अग्निबाणांचा वर्षाव केला. त्यामुळे कोस्ट गार्डच्या जवानांना परत फिरावे लागले होते. 2006 मध्ये चुकून एक मच्छिमारांची बोट तेथे गेली असता या आदिवासींनी या बोटीवरील दोन्ही मच्छींमारांना मारून टाकले. वास्तविक, हिंदुस्थान सरकारने या जमातीच्या संरक्षणासाठी सेंटिनल बेट व त्याच्या आजूबाजूचा 3 किमीचा परिसर xिंत्ल्sग्न Zदहा म्हणून घोषित केलेला आहे. या टापूत जाण्याची कोणालाही परवानगी नाही. तरीही अमेरिकेतील ख्रिश्चन धर्म प्रसारक जॉन एलन चाऊ याने 17 नोव्हेंबर 2018 ला भारतीय नौदलाच्या गस्ती पथकाची नजर चुकवून तेथे जाण्याचे धाडस केले आणि त्याला आपले प्राण गमवावे लागले.

थोडक्यात काय तर तेथे फक्त सेंटिनलीज जमातीचे राज्य आहे. त्यांना दुसऱया कुणाशीही संबंध ठेवायचा नाही. आज आपल्याकडे गावागावात कोरोनामुळे असेच चित्र पाहायला मिळत आहे. गावकऱयांनी आपल्या गावाच्या सीमा बाहेरून येणाऱया लोकांसाठी बंद केल्या आहेत. सेंटिनल बेटावर कोरोनाची साथ नसली तरी तेथील सेंटिनलीज ही आदिवासी जमात ‘आयसोलेशन’मध्ये शतकानुशतके राहत आहे. त्यांच्या बेटाच्या सीमा त्यांनी इतरांसाठी अगोदरच बंद केल्या आहेत. कोरोना आता आला, त्यामुळे जगभरात आयसोलेशनची लाट आली. सेंटिनल बेटावर मात्र हजारो वर्षांपासून ‘आयसोलेशन’ हेच तेथील आदिवासी जमातीचे जीवन आहे.