
नगर शहरामध्ये बुधवारी आणखी रुग्ण सापडल्यानंतर नगर जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 55 झाली आहे. सुमारे चार जणांचे अहवाल उशिराने प्राप्त होणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे. दरम्यान नगर शहरातील सारस नगर परिसर हा सील बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नगर शहरामध्ये कोरोनाने पून्हा डोके वर काढले आहे. मात्र काल रुग्ण आल्यानंतर त्याच्या समवेत असणाऱ्यांची असेच इतर नातेवाईकांची सुद्धा चाचणी करण्यात येत आहे.
आज पुन्हा नगर शहरातील सारसनगर येथील एका 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 55 झाला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध प्रशासनाने सुरू केला असून अनेकांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील बोलवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
दरम्यान नगर शहरात गेल्या काही दिवसंपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, काल शहरातील सुभेदार गल्ली भागात तर आज सारसनगर भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे. तसेच या परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सारसनगर भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याचे नियोजन देखील सुरू करण्यात आले आहे.
























































