कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास 75 वर्षे पूर्ण, शिवप्रेमींकडून अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक चळवळीचा धगधगता आवाज, सर्वांचे स्फुर्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास 75 वर्षे झाल्याने आज शिवप्रेमींकडुन अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात गुलामगिरीचे प्रतिक असलेला ब्रिटिश गर्व्हनर सर वेल्सी विल्सन यांचा 20 फूटाचा पांढराशुभ्र संगमरवरी पुतळा हटवुन, चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्या पुढाकराने 13 मे 1945 रोजी सन्मानेने हा शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात माजी ब्रिटिश गर्व्हनर सर वेल्सी विल्सन हा पुतळा 19 नोव्हेंबर 1929 रोजी इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी बसवला होता. स्वातंत्र्यलढ्यात येथील शाहीर दत्तोबा गोविंद तांबट व सिदलिंगा बाबुराव हावीरे यांनी पत्नी भागीरथीबाई दत्तोबा तांबट आणि जयाबाई सिदलिंगा हावीरे यांच्या मार्फत ब्रिटिशांची निशाणी असलेला हा विल्सनचा पुतळा विद्रुप करण्याचा निर्णय घेतला होता.

स्वातंत्र्यवीर निवृत्ती आडुरकर व गजनन बुसारी यांनी डाबरयुक्त ॲसिडने भरलेली 14 मडकी त्यांना विल्सन चौकात आणुन दिली. स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई दत्तोबा तांबट व जयाबाई सिदलिंगा हाविरे यांनी 10 ऑक्टोंबर 1942 रोजी घटस्थापनेच्या दिवशी दुपारी 12 वाजता चौथर्‍यावर चढून पुतळ्यावर एकामागुन एक ॲसीडयुक्त डांबराची मडकी समोरुन व मागच्या बाजुने भिरकावली. ॲसीड ओघळुन पुतळा पुर्ण विद्रुप झाला. भागीरथीबाई तांबट यांचेबरोबर त्यांचा निशिकांत हा 5 वर्षांचा मुलगा होता जो या घटनेचा साक्षीदार होता. पुतळा विद्रुप केल्याबद्दल व मॅजिस्ट्रेटला बांगड्या चोळीचा आहेर केल्याने, आठवडाभरात दोघींनी 16 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. 21 ऑक्टोंबर 1942 ला शिक्षा ठोठावण्यात आली. या तुरंगवासातच तांबट यांना 3 जानेवारी 1943 साली पुत्र झाला.

पुतळा विद्रुप झाल्याने, सरकारने 8 महिने तो झाकून ठेवला होता. त्यानंतर 13 सप्टेंबर 1943 रोजी शामराव लहुजी पाटील, शंकरराव माने, अहमद शाबाजी मुल्ला, काका देसाई कुंडल, सागावचे व्यंकटेश उर्फ नारायण घोरपडे, नारायण जगताप, पांडुरंग बळवंत पोवार, महादेव भाऊ घाटगे (वडणगे), आबु जाधव, वसंत बळवंत तावडे या स्वातंत्र्यवीरांच्या समूहाने पुतळ्यावर घणाचे घाव घालुन पुतळा उध्वस्त केला. अखेरीस 1944 मध्ये सरकारला तो तुटलेला पुतळा काढावा लागला. ‘विल्सन नोज कट’ म्हणून हा खटला गाजला. शिवभक्त आणि चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्या पुढाकराने 13 मे 1945 रोजी या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा सन्मानाने उभारण्यात आला.