
कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मुंबईहून शाहुवाडी तालुक्यात शित्तुर गावी आलेल्या एका गरोदर महिलेसह इंचलकरंजी येथील युवकाचा यामध्ये समावेश आहे. चंदगड येथे गवसे या गावी आलेल्या 30 वर्षीय महिलेसह 11 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी यांचाही रुग्णांमध्ये समावेश आहे.
चंदगडमध्ये एक आणि आजरा तालुक्यात दोन असे मुंबईहुन आलेले हे तीन रुग्ण शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर सोमवारी शाहुवाडी तालुक्यात दोन आणि पन्हाळा तालुक्यात एक असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. बुधवारी पुन्हा तिघेजण तर गुरुवारी सायंकाळी दोनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 27 जण कोरोनाबाधित आहेत. यापैकी इचलकरंजी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 10 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी आढळलेल्या दोन रुग्णांमुळे शाहुवाडी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सात झाली आहे. सर्वांवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंदगड येथे काल आढळलेले तिघे रुग्ण मुंबईतील सांताक्रूझमधून आले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांचा प्रवास झाला असून दोन दिवसांपूर्वीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. काल रात्री उशिरा त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शित्तुर तर्फ मलकापूर शाहूवाडी येथील 33 वर्षीय आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोरोना अहवाल गुरुवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात त्या 11 मे रोजी सायंकाळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी पती आणि ड्रायव्हरसोबत मुंबईहून प्रवास केला आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्यांना कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर जयसिंगपूर येथील संभाजीपूरमधील रहिवाशी असलेल्या 29 वर्षीय युवकाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोन्ही अहवालाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.




























































