
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, अशाही अवस्थेत मुंबईतील पालिकेची रुग्णालये पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. केईएम रुग्णालयात सध्या कोरोनाचे 10 वॉर्ड असून त्यात 400 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर खबरदारीचा उपाय म्हणून आणखी दोन वॉर्ड वाढवण्यात येणार असून लवकरच कोरोना बेडची क्षमता 480 वर पोहोचणार आहे.
परळच्या केईएम रुग्णालयात सध्या मुंबईच्या प्रत्येक भागातून दिवसाला कोरोनासह इतर आजारपणासाठी शेकडो रुग्ण येतात. यात अपघात, हृदयविकाराचा झटका, श्वसनविकार आणि कोरोनाच्या रुग्णांचा समावेश असतो. त्या सगळ्यांसाठी सध्या रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत, जसे बेड रिकामे होतात तसे त्यांना जागा करून दिली जाते. अनेक रुग्ण वेटिंगवर असतात. त्यात गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही महत्त्वाच्या पालिका रुग्णालयाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून रुग्णालयांना बदनाम केले जात आहे. रुग्णालयाची क्षमता संपल्यानंतरही केवळ रुग्णांचा जीव वाचावा म्हणून आहे, त्या साधनसामग्रीत तडजोड करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. डॉक्टर्स आणि रुग्णालय प्रशासनाचा यात चांगला हेतू असतो. मात्र, काही जण याचे व्हिडीओ बनवून यातून रुग्णालयांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती केईएमच्या रुग्णालय प्रशासनाने दिली.
केईएम रुग्णालयात काही रुग्ण जमिनीवर बसलेले आहेत, असा केईएममधला अपघात विभागातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ केईएम रुग्णालयातील असला तरी तो अपघात (कॅज्युअलटी) विभागातील आहे. तो कोरोना वॉर्डमधील व्हिडीओ नाही. दिवसभरात शेकडो रुग्ण केईएममध्ये येतात. काही वेळा त्यांच्यासाठी रुग्णलयात बेड शिल्लक असत नाहीत. त्यामुळे काही रुग्ण नाईलाजाने रुग्णालयाच्या आवारात थांबतात, त्यांना इथून बाहेर काढता येत नाही किंवा इथे जागा नाही, म्हणून इतर रुग्णालयात पाठवता येत नाही. उपचार घेत असलेले रुग्ण बरे होऊन घरी परतले, बेड रिकामे झाले की, आम्ही त्यांना बेड उपलब्ध करून देत असतो. ही प्रक्रिया दिवस-रात्र सुरूच असते, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
शीव रुग्णालयातील तो व्हिडीओ जुना
पालिकेच्या शीव रुग्णालयात कोरोना रुग्णांवर मृतदेहांशेजारी उपचार सुरू असलेला व्हिडीओ पहिल्या लॉकडाऊनमधील व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ जुना असून तो ज्या तारखेला सोशल मीडियावर टाकला गेला त्यावेळचा नाही. हे प्रकरण गंभीर आहे, पण या बाबतीत नेमके दोषी कोण हे ठरवता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय आणि सगळा स्टाफ जीव तोडून मेहनत घेत आहेत. अशा व्हिडिओमुळे त्यांना त्रास होत आहे. त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे यापुढे आपल्या कर्मचाऱ्यांना कोणी जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास थेट पोलिसात तक्रार करू, असा इशारा शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिला.

























































