
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पाच कोरोना बाधीत रुग्ण वाढले असताना, आज सायंकाळी पुन्हा दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने,जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकुण २९ वर गेली आहे. यामध्ये इंचलकरंजी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला असुन,इतर दहा जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.मुंबई,पुणे,सोलापूर अशा रेडझोन मधुन येणा-यांची वाढती संख्या आणि त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा वाढता आकडा पाहता,सध्या ऑरेंज झोन मध्ये असलेला, कोल्हापूर जिल्हा कोणत्याही क्षणी रेड झोन मध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज सायंकाळी कोरोना पॉझीटिव्ह आढळलेल्या दोघांपैकी एकजण इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात तर एक जण छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात आहे. त्यांची माहिती घेतल्याचे काम उशीरापर्यंत सुरू असल्याने, प्रशासनाकडून उशीरापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.आज दिवसभरात सीपीआर रुग्णालयातील कोरोना कक्षात २१० स्वब चाचणी अहवाल मिळाले असून,हे सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मुंबई,पुणे रेड झोनमधील प्रवाशांना कोल्हापूरात तुर्त प्रवेश नको -सतेज पाटील
दरम्यान मुंबई आणि पुण्यावरून आज अखेर जिल्ह्यात ८६ हजारहुन अधिक लोक दाखल झाले आहेत. तर अजुनही हजारोंच्या संख्येने दाखल होणार आहेत. यात रेड झोनमधून काल गुरुवारी एका दिवसात ६०० वाहने कोल्हापूरात आली आहेत. त्यातील ४०० वाहने एकट्या मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या रेड झोनमधील प्रवाशांना कोल्हापूरात प्रवेश देऊ नये,अशी विनंती प्रशासनाला केली आहे.याबाबत त्यांनी राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विनंती पत्र दिल्याचीही माहिती समोर येत आहे.

























































