
मुंबईतील चर्चगेट येथील सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर महापालिका आता कोरोना क्वारेंटाईन सुविधा सुरू करणार आहे. पालिकेने याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केलेल्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मैदान उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे कळवले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने मुंबईतील मोकळी मैदाने, एक्सिबिशन सेंटर, मोठी सभागृहे ताब्यात घेऊन कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी मैदान, गोरेगाव नेस्को सेंटरनंतर मोठी क्वारेंटाईन सुविधा करता येणारे वानखेडे स्टेडियम वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून एमसीएला कोरोना क्वारेंटाईनासाठी तात्पुरत्या तत्त्वावर स्टेडियम देण्याची विनंती केली होती. याला एमसीए प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनने करोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला 50 लाखांची आर्थिक मदत दिली होती. याचसोबत गरज लागल्यास आपल्या अखत्यारीत असणारी मैदाने क्वारेंटाइन सुविधेसाठी वापरण्याची तयारीही मुंबई क्रिकेट असोसिएशनने दर्शवली आहे. त्यानुसार वानखडे मैदान कोरोना रुग्णांच्या सुविधासाठी देण्यात यावे, अशी विनंती पालिका प्रशासनाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली आहे. कायदा 1897 अंतर्गत कोणतीही जागा ताब्यात घेण्याचे अधिकार पालिकेला आहेत. त्यानुसार या मैदानावर लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाग्रस्तांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेशी संपर्क केला. आम्ही या संकटसमयी सरकारला मदत करण्यास तयार असून या संकटसमयी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सरकारला मदतीचा हात देण्यास एमसीए नेहमी तत्पर राहील.
– डॉ. विजय पाटील, अध्यक्ष – मुंबई क्रिकेट संघटना



























































