परभणी जिल्ह्यात ‘सारी’चा पहिला बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या एका 50 वर्षांच्या मजूराचा सारी आजाराने शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू सारी आजाराने झाल्याच्या माहितीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दुजोरा दिला आहे.

गंगाखेड – परभणी रोडचे काम करणारा 50 वर्षांचा मजूर गंगाखेड तालुक्यातील महातपुरीफाटा येथे वास्तव्यास होता. त्याला ताप व इतर लक्षणे जाणवत असल्याने उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणुन मजूरासोबत राहणार्‍या चार व्यक्तींनाही जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील 50 वर्षीय मजूराला सारी आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली. शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये कोरोनाने डोकेवर काढले असतानाच सारी आजाराने पहिला बळी घेतला असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.