वानखेडेवर क्वारंटाइन करणार नाही, गरज भासल्यास ‘पार्किंग’ वापरणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमवर क्वारेंटाइन सुविधा सुरू करणार नसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज स्पष्ट केले आहे. क्वारेंटाइनसाठी कोणतेही मैदान ताब्यात घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. गरज भासल्यास पालिकेची पार्किंग क्वारेंटाइनसाठी वापरण्यात येईल असेही ते म्हणाले. मैदानात क्वारंटाइन सुविधा केल्यास पावसाळ्यात गैरसोय होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

मुंबईत वाढणार्‍या रुग्णसंख्येमुळे क्वारंटाइनची सुविधा वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून एमसीएला विचारणा करण्यात आली होती. याला एमसीएकडून सकारात्मक प्रतिसाद देत गरज लागल्यास पालिकेला मैदान देण्यास तयार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात मैदानांवर चिखल होऊन गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे खुली मैदाने ताब्यात घेणार नसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गरज लागल्यास आपल्याकडे उपलब्ध असलेली पार्किंगची सुविधा क्वारंटाइनसाठी वापरता येऊ शकतो असे चहल म्हणाले.

संयम पाळा, यश नक्कीच मिळणार!

मुंबईत रुग्ण डबल होण्याचे प्रमाण सात दिवसांवरून 14.5 दिवस झाल्याची माहितीही त्यांनी दिली. पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रतिबंधित क्षेत्रात नियम कडक करून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढला असला तरी सर्व नागरिकांनी संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. आपल्याला यश नक्कीच मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.