
पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वलासह परदेशात आढळणारे पेंग्विन आणि अनेक देशी-परदेशी पशुपक्षी आहेत. मात्र पालिकेच्या सर्वोत्तम उद्यान आणि प्राणी संग्रहालयाची संपूर्ण जबाबदारी असणार्या संचालकांना पालिका प्रशासनाच्या कारभारामुळे ठाण्याहून दररोज ये-जा करावी लागत आहे. या ठिकाणी संचालकांच्या निवासस्थानी ‘दुसरा’च अधिकारी राहत आहे. त्यामुळे अचानक कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोणाला धरणार असा सवाल निर्माण होत आहे.
भायखळा येथील पालिकेचे उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे मुंबईकरांनाच नव्हे तर देशी-परदेशी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरले आहे. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. 2017 मध्ये या ठिकाणी पेंग्विन आणल्यापासून तर राणी बागेचे आकर्षण आणखीनच वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत तर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचा कायापालट केला आहे. वाघ, बिबट्या, तरस, अस्वल, अजगर, कोल्हा यांच्यासह देशी-विदेशी दुर्मिळ पशू-पक्षी आणले आहेत. लवकच सिंह, जिराफ, कांगारू, झेब्रा आणण्याचे नियोजनही आहे. त्यामुळे उद्यान प्राणी संग्रहालयाच्या संचालकांनी या ठिकाणी २४ तास वास्तव्यास राहणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी सहा महिन्यांपासून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहत आहेत. सध्या त्यांचीही बदली झाली आहे. मात्र या प्रकारात उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांना आपल्या ठाणे येथील निवासस्थानाहून रोज ये-जा करावी लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही.
संचालकांच्या निवासस्थानी दुसरा अधिकारी राहतोच कसा!
राणी बागेतील महापौर बंगल्याशेजारीच उद्यानाच्या संचालकांसाठी निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या दुरुस्तीचे काम दोन वर्षे सुरू होते. यानंतर सहा महिन्यांपूर्वी काम पूर्ण झाल्यानंतर सध्याचे संचालक असलेले डॉ. संजय त्रिपाठी यांनी १५ दिवस वास्तव्यही केले. मात्र पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड यांच्यासाठी हे निवासस्थान द्यायचे असल्याने डॉ. त्रिपाठी यांना तातडीने हे निवासस्थान सोडण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे डॉ. त्रिपाठी यांना सध्या दररोज ठाण्याहून ये-जा करावी लागत आहे.
उद्यान प्राणी संग्रहालयाच्या संचालकांनी याच ठिकाणी राहणे अनिवार्य आहे. कारण दुर्मिळ प्राणी-पक्षांवर लक्ष ठेवता येईल. असे असताना उद्यानातील संचालकांसाठी राखीव असणारे निवासस्थान दुसर्या अधिकार्याला राहण्यास दिलेच कसे याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले जाईल. तातडीने हे निवासस्थान संचालकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात येतील.
– किशोरी पेडणेकर, महापौर



























































