मास्क, सॅनिटायझर आणि खाऊ; महिला कॉन्स्टेबलच्या मुलीचा अनोखा वाढदिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने सणवार, लग्नसोहळे, वाढदिवस अशा कार्यक्रमांवर गदा आणलीय. फार इच्छा असूनही असे करता येत नाहीय. महिला पोलिस अंमलदार रेहाना शेख यांची देखील अशीच अडचण झाली. त्यांना त्यांच्या मुलीचा वाढदिवस उत्साहात साजरा करायचा होता. पण त्या थांबल्या नाही तर त्यांनी तो केलाही. त्यांना स्वत: तसेच मुलीला प्रत्यक्ष वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये सहभागीहोता आले नाही. पण त्यांना आदिवासी पाड्यातील शेकडो लहानग्यांना या लॉकडाऊनमध्येही आनंद देता आला.

सशस्त्र दलातील विभागात रेहाना शेख कार्यरत आहेत. 14 तारखेला त्यांची मुलगी नम्रा हिचा 16 वा वाढदिवस झाला. रेहाना यांना हा वाढदिवस पनवेलच्या धमणी या आदिवासी पाड्यातील लहानग्यासह साजरा करायचा होता. तशी त्यांनी कार्यक्रमाची आखणी देखील केली. पण लॉडाऊनमुळे तसे होणे शक्य होत नव्हते. तरीही रेहाना यांनी हार मानली नाही. त्यांंनी आदिवासी पाड्यातील ज्ञानाई शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लहानग्या विद्यार्थांसाठी पाच हजार रूपये शाळेच्या बँक खात्यात टाकले. तसेच 14 तारखेला 100 विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज तसेच सुकामेवा आणि खाद्यपदार्थ पाठवून दिले. मग अंमलदार रविंद्र पाटिल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सर्व छोट्या मुलांना वाटप केले. अशा प्रकारे रेहाना शेख यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या मुलीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

50 मुलांना दत्तक घेणार

आपण समाजाचे देणे लागतो याच भावनेतून आम्ही आदिवासी पाड्यातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करायचे ठरवले होते. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष तेथे जाता आले नाही. पण त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थोडा का होईना आनंद फुलवता आला. लवकरच 50 मुलांना दत्तक घेणार असल्याचे रेहाना शेख यांनी सांगितले.