
लॉकडाऊन लागू झाल्या पासून आजपर्यंत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्याची कारवाई पोलीस यंत्रणेने हाती घेतली होती. नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही सर्व वाहने कमीत कमी दंड आकारून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आले तेंव्हा पासून ते आजपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची वाहने जप्त करण्याची कारवाई जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखा मार्फत राबविण्यात आली होती. या कारवाईत आजपर्यंत 1758 दुचाकी 157 चारचाकी व ऑटोरिक्षा जप्त करण्यात आले.
आज घडीला नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही सर्व जप्त वाहने कमीत कमी 200 रुपये दंड आकारून मंगळवार,19 मे पासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वाहने सोडतांना सोशल डिस्टन्स पाळले जावे म्हणून दिलेल्या वेळापत्रका नुसार सोडण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी आपले वाहन ज्या पोलिस ठाणे अथवा वाहतूक शाखे मार्फत जप्त करण्यात आले होते. तेथे वाहनाची कागदपत्रे दाखवून मास्क अथवा रुमाल बांधून गर्दी न करता आपले वाहन दिलेल्या तारखेस येऊन घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढेही वाहन घेऊन विनाकारण फिरतांना आढळल्यास मोटार वाहन कायद्याप्रमाणे संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
































































