
श्रीनगरमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यातील एका दहशतवाद्याचे नाव जुनैद सेहराई असे असून तो तेहरीक-ए-हुर्रीयतचा प्रमुख अश्रफ सेहराई यांचा मुलगा आहे. या चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये CRPF च्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या चकमकीला सोमवारी रात्री सुरुवात झाली होती.
पोलिसांनी 6 मे रोजी रियाझ नायकू नावाच्या कुख्यात दहशतवाद्याला यमसदनी पाठवले होते. त्यानंतर पोलिसांनी 10 कुख्यात पाहिजे दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये जुनैद सहराईचाही समावेश होता. गेल्या वर्षी कलम 370 रद्द केल्यानंतर श्रीनगरमध्ये झालेली ही पहिली चकमक आहे. या चकमकीनंतर प्रतिक्रिया देताना पोलिसाने सांगितले की या चकमकीमध्ये सामान्य नागरिकांच्या जिवाला किंवा मालमत्तेला कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही याची आम्ही खातरजमा करत आहोत. आम्ही ही प्रक्रिया अत्यंत सावकाश करीत आहोत कारण ज्या भागामध्ये चकमक झाली तो दाटीवाटीचा भाग आहे.
फुटीरतावाद्याच्या मुलाला यमसदनी पाठवल्याची ही इतिहासातील पहिली वेळ आहे. जुनैद सेहराई याने कश्मीर विद्यापीठातून MBA ची पदवी मिळवली होती. माथे भडकल्याने त्याने हिजबुल मुजाहीदीन या दहशतवादी संघटनेचा रस्ता निवडला होता. जुनैदचे वडील अश्फ सेहराई हे 2018 साली तेहरीक-ए-हुर्रीयत या फुटीरतावादी संघटनेच्या प्रमुखपदी निवडण्यात आले होते. सय्यद अली गिलानी यांनी तेहरीक-ए-हुर्रीयतची स्थापना केली होती. ते अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर सेहराई यांची निवड झाली होते. या संघटनेची स्थापना 2004 साली झाली होती आणि तेव्हापासून सेहराई यांनी या संघटनेत सरचिटणीसपद सांभाळले होते.




























































