
कुडाळ उद्यमनगर येथे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. उद्यमनगर येथील आर. एस. एन. हॉटेलसमोर महामार्गावर दुभाजक असल्याने भविष्यात कुडाळ एम. आय. डी.सी. येथे मोठया गाडयांची ये- जा होताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याबाबत उद्योजकांनी वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. त्यावर नाईक यांनी मोठ्या गाड्यांची सहज वाहतूक होण्यासाठी आर. एस. एन. हॉटेलसमोर महामार्गावर लेव्हल क्रॉसिंग करण्याच्या सूचना महामार्ग अधीकारी व दिलीप बिल्डकॉन कंपनीचे व्यवस्थापक यांना केल्या आहेत.
गेल्यावर्षी महामार्ग चौपदरीकरणाचा फटका लोकांना बसला होता. त्याबाबत यावर्षी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती नाईक यांनी घेतली. गटारांची कामे अर्धवट असल्यास ती पूर्ण करावीत. ज्याठिकाणी पाणी साचणार आहे. त्याठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने उपायोजना करा. पावसाळयात महामार्गाच्या कामाचा कोणताही त्रास नागरिकांना होता कामा नये. अपूर्ण कामे पूर्ण करा, तसेच कुडाळ तालुक्यातील सर्व सर्व्हिस रोड पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करा, अशा सूचना नाईक यांनी महामार्ग अधीकारी व दिलीप बिल्डकॉन कंपनीचे व्यवस्थापक यांना केल्या आहेत .
महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या काही जणांना मोबदला मिळाला नाही. खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील जमीन मोबदल्याचे पैसे मंजूर झाले आहेत. संबंधिताना त्यांचा मोबदला लवकरात लवकर मिळावा, यासाठी नाईक यांनी प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्याशी फोनवर चर्चा करत मोबदला मिळवून देण्याच्या सूचना केल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, नगरसेवक सचिन काळप, महामार्ग कनिष्ठ अभियंता आय. एस. मनेर, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे व्यवस्थापक के. के. गौतम, एमआयडीसी उपअभियंता अविनाश रेवंडकर, एमआयडीसी उद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष आनंद बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

























































