
लॉकडाऊनच्या काळात तिप्पट भावाने दारूची विक्री करणाऱ्यांसाठी तस्करी करणाऱ्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आज अटक केली. ट्रक व पिकअप व्हॅनमधून 68 लाख 31 हजार रुपये किमतीचे 499 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला आहे. फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलंब्री तालुक्यातल्या गुंजाळवाडी येथे एक व्यक्ती हा विदेशी दारूचा मोठा साठा शेतात नेणार आहे. संभाजीनगर येथून येणाऱ्या एका ट्रकमधून तो दारूचे बॉक्स उतरवून पिकअपमधून त्याची वाहतूक करणार आहे, अशी माहिती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने भल्या पाहाटे गुंजाळवाडी रोडवर सापळा रचला. पथकाने गुंजाळवाडी शिवार गाठताच या ठिकाणी ट्रक (क्र. एमएच 20 एए 8988) मधून विदेशी दारूचे बॉक्स बाजूला उभ्या असलेल्या पिकअप व्हॅन (एमएच 20, डी ई 4775) मध्ये टाकण्यात येत होते. पोलिसांची गाडी जवळ येताच तिघांपैकी एक जण पळून गेला. पोलिसांनी गुंजाळवाडीतील मैनाजी मोतीराम गुंजाळ (36) आणि जुबेर अकबर पटेल (26) या दोघांना पकडले. पळून गेलेल्याचे नाव सुखलाल मनाजी जाधव असे आहे.

पोलिसांनी ट्रकमधील बॉक्सची पाहणी केली असता त्यात 460 ऑफिसर चॉईस दारूचे बॉक्स होते, तर 48 बॉक्स हे पिकपमध्ये ठेवण्यात आलेले होते. पोलिसांनी दोन वाहनांसह विदेशी दारूचे 499 बॉक्स जप्त करत फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, डीवायएसपी विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, विठ्ठल राख, संदीप सोळंके, संजय देवरे, अनिल चव्हाण, संजय भोसले, उमेश बकले, संजय तांदळे आदींनी केली.




























































