
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात 24 कोरोना बाधित सापडले असून त्यातील 6 जण हे बाहेरील जिल्ह्यात उपचारासाठी गेले आहेत. हे रुग्ण बीड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची 17 इतकी झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या एकूण 114 जणांचे नमुने बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. 6 जणांचे अहवाल संशयित रुग्ण असल्याकडे दिशानिर्देश करत आहेत. तर 90 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. उरलेल्या 14 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. हे 14 अहवाल मिळून बीड जिल्ह्यात एकूण 32 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या रुग्णांचा चाचणी अहवाल काय येतो याकडे आता बीडवासीयांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग स्थलांतरित
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयाचे बाह्यरुग्ण (ओपीडी)विभाग हा आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. येथील जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीमध्ये कोव्हीड 19 चे विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रसुती विभागासह विविध वॉर्ड आदित्य आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. इथला बाह्यरुग्ण विभाग हा देखील गुरुवारपासून आदित्य आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आहे.























































