मुंबईच्या चौपाट्यांवर सुरक्षा ‘टाईट’ लाइफ गार्डला ‘बॅकअप’ देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईच्या सहाही चौपाट्यांवर 94 लाइफ गार्ड तैनात ठेवून सुरक्षा व्यवस्था ‘टाईट’ केली आहे. शिवाय आता पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत पालिकेच्या फायर ब्रिगेडची ‘फ्लड रेस्क्यू टीम’ही लाइफ गार्ड्सना ‘बॅकअप’ देण्यासाठी चौपाट्यांवर धावून येणार आहे. पालिकेचे अग्निशमन दल प्रमुख डॉ. प्रभात रहांगदळे यांनी ही माहिती दिली. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे फायर ब्रिगेडच्या ‘फ्लड रेस्क्यू टीम’ने गिरगाव चौपाट्यांवर थरारक ‘टेस्टिंग’ सुरू केले आहे.

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा चौपाट्यांवर पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक-मुंबईकर गर्दी करतात. मात्र यावेळी काही अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून 94 लाइफ गार्ड्स तैनात ठेवण्यात येत आहेत. या लाइफ गार्डकडे बचावकार्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारची साधने दिलेली असतात. तरीदेखील मोठी दुर्घटना किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास मदत व्हावी यासाठी आता फायर ब्रिगेडच्या फायर रेस्क्यू टीमही मदत दिली जाणार असल्याचे प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. यासाठी जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री तैनात ठेवण्यात येणार असल्याचेही रहांगदळे यांनी सांगितले. पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे सध्या शनिवार-रविवारी फायर ब्रिगेडच्या फ्लड रेस्क्यू टीमचे टेस्टिंग घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

परस्पर सहकार्यातून होणार काम

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास पालिका कर्मचार्‍यांसह फायर ब्रिगेडच्या माध्यमातूनही बचावकार्य केले जाते. यामध्ये आता अतिवृष्टी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहरात पाणी साचल्यास फायर ब्रिगेडला सहकार्य करण्यासाठी लाइफ गार्डही धावून येणार आहे. लाइफ गार्डला सहकार्य असेल तेव्हा फायर ब्रिगेडची फ्लड रेस्क्यू टीम मदत करणार आणि जेव्हा फ्लड रेस्क्यू टीमला शहरातील बचावकार्यासाठी जादा मनुष्यबळ-सहकार्याची गरज असेल तेव्हा लाइफ गार्डचे सहकार्य घेण्यात येणार आहे. समन्वयातून काम केले जाणार आहे. लाइफ गार्डला बॅकअप देण्यासाठी फायर ब्रिगेडच्या फ्लड रिस्पॉन्स टीम गवालिया टँक फायर स्टेशन, वांद्रे फायर स्टेशन, कुर्ला फायर स्टेशन, मालाड फायर स्टेशन, दहिसर फायर स्टेशन आणि गोराई फायर स्टेशनवरून घटनास्थळी धाव घेणार आहेत.