
कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकेंची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकेंची संख्या व उपलब्धता वाढवणार, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पीएमपीएल व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी आशा एकूण 2 हजार 342 रुग्णवाहिका आहेत. सध्या कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी पीएमपीएलकडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
या सर्व रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वॉर्ड निहाय या रुग्ण वाहिका थांबवण्यात येतील. रुग्णांना नेण्यासाठी जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्ड मूळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने ऍडमिट करणे सोयीचे होणार आहे. रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पीपीइ किट, मास्क, ग्लोव्हज घालणे अनिवार्य राहील. कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतील असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

























































