
देशभरात तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मॉन्सूनने आगमनाची चाहूल दिली आहे. तसेच देशभरात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या मॉन्सूनपूर्व सरी असल्या तरी मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने बळीराज सुखावला आहे. तसेच या सरीमुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.
राजधानी दिल्लीत वातावरणात बदल झाला असून तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे. तसेच ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. तर केरळमध्ये पावसाचे आगमन झाले असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. केरळमध्ये दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यामुळे मॉन्सूनचे आगमन झाले असून त्याची आगेकूच सुरू होणार आहे. कर्नाटकमधील बंगळुरूमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. उत्तर हिंदुस्थानात पारा घसरला असून उत्तर प्रदेश, बिहारमध्ये,पंजाब आणि राजस्थानमध्ये ढगाळ वातावरण आहे. तसेच पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत धुळीचे वारे राहण्याची शक्यता असून मॉन्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे.
आगामी 24 तासात दक्षिण-पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. तसेच येत्या 24 तासात तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप,अंदमान, निकोबार, ओदिशामध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर आसाम,मणीपूर, मिझोराम,त्रिपुरा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब ,हरियाणा या भागात काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस झाला आहे.
























































