
कोरोनाच्या भितीने एपीएमसीच्या सर्वच मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे व्यापाऱ्यांवर मालाचे राखण करण्याची वेळ आली आहे. शासनाने लावलेल्या निकषांनुसार सर्वच मार्केटमध्ये आवक कमी झाली आहे. मालाची आवक सरासरी फक्त 30 टक्के आहे. तरीही मालाला उठाव नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.
मुंबई शहर आणि परिसराला एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केटमधून दररोज 130 ट्रक मालाचा पुरवठा झाला तरच या भागात कांदा बटाट्याचे दर स्थिर राहतात. भाजीपाला मार्केटमधूनही मुंबई शहरात दररोज सुमारे साडे सहाशे ते सातशे गाड्या माल घेऊन जातात. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या नियंत्रित करण्यात आली आहे. शासनाच्या निकषांपेक्षाही कमी वाहने मार्केटमध्ये येत आहेत. कांदा बटाटा मार्केटमध्ये दररोज मालाची आवक 25 गाड्यांच्या आसपास आहे. मात्र ग्राहक मार्केटमध्ये फिरकत नसल्याने निम्म्यापेक्षा जास्त माल शिल्लक राहत आहे.
ड्रायव्हर मिळेनात
धान्य मार्केटमधील व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होतात. मात्र, या मार्केटमध्ये सध्या गोणी उचलण्यासाठी माणसे मिळत नाहीत. तसेच जी वाहने धान्याची वाहतूक करतात त्यांचे चालक गावी गेले आहेत. त्यामुळे किरकोळ दुकानदारांना धान्य पाठवताना व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत.

























































