जादूटोण्याच्या संशयावरून 14 वर्षांच्या मुलाची दगडांनी ठेचून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका 14 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ओडिशा येथील मलकानगिरी जिल्ह्यात हा प्रकार घडला. हत्येनंतर या मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते खड्ड्यात पुरण्यात आले आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, येथील केंदुगुडा नावाच्या गावात गेल्या तीन महिन्यात एका अज्ञात आजाराने 17 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने अन्य आजारी व्यक्तींवर इलाज सुरू केले असले तरी आजाराचं मूळ कारण अद्याप सापडलेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांना काही जादूटोण्याचा प्रकार असावा, असा संशय होता. या मागे पीडित मुलाच्या कुटुंबाचा हात असावा, असंही त्यांना वाटत होतं.

5 जूनपासून हा अल्पवयीन मुलगा गायब होता. त्याच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर जंगलात या मुलाचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या मुलाची हत्या केल्याचं सांगितलं.

आरोपींनी या मुलाला काहीतरी बहाण्याने जंगलात नेलं आणि तिथे त्याच्यावर हल्ला केला. त्याला दगड विटांनी ठेचून आरोपींनी ठार मारलं. त्याच्या मृत्युनंतर त्याचा मृतदेह तुकडे करून पुरला, अशी कबुली या चार आरोपींनी दिली आहे.