
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अडीच महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर शुक्रवारी म्हणजेच 5 जूनपासून सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली. 9 जून रोजी म्हणजेच मंगळवारी या दुकानांच्या वेळेबाबत एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर रात्री आठ नंतर असलेली संचारबंदी लक्षात घेता दुकानातील कर्मचारी घरी वेळेत पोहोचावेत यासाठी दुकाने पाच वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. सकाळी 9 वाजता सुरू होणारी ही दुकाने 5 वाजेपर्यंत सुरू होती, मात्र आता या दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मुंबईमधील मॉल, व्यापारी संकुले ही मात्र अजूनही बंदच राहणार आहेत.
मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी एक आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये मुंबईतील ही ‘Full working hours’ म्हणजेच आखून दिलेल्या कामाकाजी वेळात पूर्णकाळ सुरू असतील असे म्हटले आहे. ही दुकाने रविवार वगळता इतर सर्व दिवस सुरू राहणार आहेत. मुंबईतील दुकानदारांनी रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.
गेल्या शुक्रवारी दुकानदारांनी मात्र मोठ्या उत्साहाने दुकाने सुरू केली होती, मात्र ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरवली होती. दुकानदार आणि सेल्समन तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्हज घालून हसतमुखाने स्वागतासाठी तयार होते. सोशल डिस्टंसिंग पाळले जावेत यासाठी दुकानाबाहेर चौकोन आखले गेले, पण अनेक दुकानांमध्ये रविवारपर्यंत ग्राहक फिरकले नव्हते.
मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे तसेच मॉल आणि व्यापारी संकुले वगळून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. सम आणि विषम नियम पाळून मोजकीच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. ही अट अजूनही लागू ठेवण्यात आली आहे. जी उत्तर विभागातील दादर, माहीम आणि धारावी ही प्रतिबंधित क्षेत्र वगळून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार पूर्व आणि दक्षिणेकडील दुकाने तर मंगळवार गुरुवार आणि शनिवारी पश्चिम आणि उत्तरेकडे दुकाने सुरू राहतील असे जाहीर करण्यात आले होते. किराणामाल औषधे आणि दूध विक्रीची दुकाने सोडून इतर दुकाने रविवारी बंद राहतील असेही यापूर्वी जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आले होते, ही अटक देखील कायम ठेवण्यात आली आहे.



























































