वेळेचे बंधन रद्द, दुकाने दिवसभर सुरू! पालिकेकडून नवी नियमावली जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन खुले करण्यासाठी सुरू केलेल्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत दुकानांवर 9 ते 5 वेळेचे घातलेले बंधन आता उठवण्यात आले असून दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी परिपत्रक काढून निर्देश दिले आहेत. दुकाने दिवसभर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली तरी दुकानदार-व्यावसायिकांना सोशल डिस्टंन्सिंग आणि सुरक्षेची खबरदारी घेणे बंधनकारकच राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे लॉकडाऊन आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. राज्य सरकारने त्या बाबतीत निर्देश दिल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेनेही नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजी मंडई तसेच बाजारपेठा आणि दुकाने सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. यात एका दिवशी उजवीकडे तर दुसऱ्या दिवशी डावीकडची दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मोठी बाजार संकुले बंदच राहणार आहेत. यावेळी सोशल डिस्टनसिंग आणि वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. मात्र, रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान, रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी सुरू राहणार आहे.

खासगी कार्यालयात 10 टक्के उपस्थिती

खासगी कार्यालयात 10 टक्के उपस्थिती किंवा 10 कर्मचारी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर त्यांनी घरून काम करणे आवश्यक आहे. कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्व जबाबदारी ही मालकाची असेल. कर्मचारी घरी परतताना त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग घरी शिरू नये, यासाठी सॅनिटायझिंगचे योग्य ते प्रशिक्षण त्यांना दिले जावे, अशी सूचना पालिकेने खासगी कार्यालयांना केली आहे.

वर्तमानपत्रे घरपोच मिळणार

वर्तमानपत्रे छापून ती वितरित करायला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ती घरपोचही मिळणार आहेत. मात्र, वर्तमानपत्रे घरपोच करताना मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर वापरणे, हे वर्तमानपत्रे टाकणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीसाठी बंधनकारक आहे.

व्यायामाची साधने वापरू नका!

घराबाहेर व्यायाम करायला परवानगी देण्यात आली असली तरी व्यायामाची साधने वापरायला परवानगी देण्यात आलेली नाही. घराबाहेर, उद्यानात, खुल्या व्यायामशाळेत साधनांशिवाय व्यायाम करायला परवानगी देण्यात आली आहे.

अशैक्षणिक कामांना परवानगी

विद्यापीठ, महाविद्यालये आणि शाळांमधील अशैक्षणिक कामे करायला परवानगी देण्यात आली आहे. शिकवणे सोडून डिजिटल अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि निकाल लावणे यासारखी कामे केली जाऊ शकतात. त्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यापीठ, महाविद्यालये आणि शाळांमध्ये जाऊ शकतात.

‘एमएमआर’मधील वाहतुकीवर बंधने नाहीत

राज्यांतर्गत आणि जिल्ह्याअंतर्गत वाहतुकीसाठी आधी असलेले नियम कायम आहेत. त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतुकीवर कोणतेही बंधन नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले मजूर, कामगार, भाविक, विद्यार्थी आणि प्रवासी यांना केंद्र सरकारने लागू केलेले नियम पाळणे आवश्यक आहे.