पालिकेचे प्रमुख जल अभियंता शिरीष दीक्षित यांचे निधन; शेवटच्या दिवसापर्यंत होते कार्यरत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा खात्याचे प्रमुख अभियंता, उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाले आहे. ते 54 वर्षांचे होते. दीक्षित यांच्या निधनामुळे पालिकेने कार्यतत्पर, प्रयोगशील आणि निष्णात अधिकारी गमावला आहे. काल रात्री उशिरा निधन झालेले दीक्षित हे सोमवारीही नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर होते. दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभाव असलेला अधिकारी निघून गेल्यामुळे पालिका प्रशासनासह समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.

शिरीष दीक्षित यांनी 1987 मध्ये ‘दुय्यम अभियंता’ (सब इंजिनिअर) या पदावर रुजू होत पालिकेतील आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. आपल्या महापालिकेतील सेवा कारकिर्दीदरम्यान पाणीपुरवठा विषयक अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अभियांत्रिकी क्षेत्राची सखोल जाण असणारे, मितभाषी व निगर्वी स्वभावाचे दीक्षित हे महापालिका कर्मचारी व अभियंत्यांमध्ये लोकप्रिय होते. अत्यंत मितभाषी असलेले दीक्षित हे अभियांत्रिकी कौशल्यात निष्णात व पारंगत होते. पाणीपुरवठा प्रकल्पांपैकी, मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत असणार्‍या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रिया केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंतचा तब्बल 15 किलोमीटर लांबीचा जलबोगदा करण्यात आणि गारगाई प्रकल्पाला गती देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. सध्या त्यांच्याकडे उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पदाची जबाबदारीही होती.

‘कोविड योद्धा’ म्हणूनही उल्लेखनीय काम

‘कोरोना कोविड-19’ च्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी एनएससीआय येथे उभारण्यात आलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ आणि ‘रेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण केंद्रांच्या उभारणीत दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. याच बरोबर वेळोवेळी अभियांत्रिकी विषयक अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात त्यांचा पुढाकार होता.

लॉकडाऊनमध्येही मुंबईकरांना अविरत पाणीपुरवठा

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्याची महत्त्वाची जबाबदारी दीक्षित यांच्यावर होती. दीक्षित यांनी उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करून लॉकडाऊनमध्येही मुंबईकरांना अविरत पुरवठा करीत पाणी कमी पडू दिले नाही. कमी मनुष्यबळाचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले.