कोल्हापूर – ऐतिहासिक बिंदू चौकाच्या बुरुजावर जाहिरातबाजी करण्याचा प्रयत्न युवासैनिकांनी उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या कोल्हापूरच्या वेशीवरची प्राचीन तटबंदी आणि हेरिटेजमध्ये समावेश असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौकाच्या बुरुजावरच खुलेआम जाहिरातबाजी करण्याचा बेकायदेशीर प्रकार आज युवासैनिकांनी उधळुन लावला. कोणाचीही परवानगी न घेता,बुरुजाचे विद्रुपीकरण करणा-यांना फैलावर घेत हा रंग काढुन टाकण्यास भाग पाडले.

ऐतिहासिक बिंदू चौकातील या बुरुजावर जाहिरातबाजी करुन विद्रुपीकरण करण्यात येत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक आदिल फरास,युवासेनेचे मंजित माने यांनी धाव घेत विचारणा केली. यावेळी कोणाचीही परवानगी न घेता बुरुजांची आतील आणि बाहेरील तटबंदीची भिंत रंगविल्याचे उघड झाले. तसेच यावेळी उपस्थित वसीम पटेल यांच्याकडून ही जाहिरात करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यासाठी महानगरपालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी यांनी तोंडी सांगितल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संबंधितांना चांगलेच धारेवर धरुन बुरुजावरील रंग पुसुन काढण्यास भाग पाडले.