
>> प्रज्ञा सदावर्ते
पशुवैद्यक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जगन्नाथ गंगावणे यांनी दुग्धोत्पादनवाढीसाठी पशुधनावर महत्त्वपूर्ण संशोधन करीत महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांनी 45हून अधिक वर्षे देशातील पशुचिकित्सकांना पशुधनातील भ्रूणप्रत्यारोपण अर्थात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान, संकरीकरण यांचे मोफत प्रशिक्षण दिले. माझ्या महाराष्ट्रातील पशुपालक व शेतकNयांना दुग्धोत्पादन वाढीतून अर्थार्जनाचा मार्ग दाखवेन हा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यासाठी ते कायम कार्यरत राहिले. डॉ. गंगावणे यांचे 8 जून रोजी वयाच्या 70व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. ते केवळ संशोधन करून स्वस्थ बसले नाही, तर त्या संशोधनाचा उपयोग हजारो पशुपालकांना व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश आले.
सुरेश गंगावणे यांनी 1973 साली मुंबई येथील पशुवैद्यक महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यानंतर ते नाशिकच्या श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ येथे प्रदीर्घ काळ मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. येथेच त्यांनी अनेक महत्त्वाचे संशोधन केले. सन 1970 साली कृत्रिम रेतन पद्धतीने संकरीत गाईंची पैदास केली. 1988 साली राज्यात प्रथमच त्यांनी गाईंमधील भ्रूणप्रत्यारोपण (टेस्ट ट्यूब बेबी)चा प्रयोग यशस्वी करीत सर्वदूर पोहचवला. त्याचे यूएसए आणि फ्रांन्समध्येही प्रशिक्षण दिले. सातत्याने ते देशविदेशातील पशुवैद्य आणि पशुपालकांना मार्गदर्शन करत होते. त्यांचे ‘गो-गाथा आणि कृत्रिम रेतन’ ही पुस्तके हजारो पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरली. त्यांच्या संशोधनामुळे दुग्धोत्पादनवाढीचे राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. डॉ. गंगावणे यांनी फ्रांस सरकारसाठी कृषी आणि पशुवैद्यकीय सल्लागार म्हणून काम पाहिले. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ, राज्यासह देशातील विविध डेअरी प्रकल्प यांच्याकरिता त्यांनी सल्लागार म्हणून मोलाची भूमिका पार पाडली. लष्कराच्या देशभरातील डेअरी फार्म येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण वर्ग घेतले. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पीक उत्पादनवाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराविषयीचे संशोधन हाती घेत यशस्वी केले. ही औषधे त्यांनी शेतकNयांना उपलब्धही करून दिली. कायम संशोधनात मग्न राहत त्यांनी पशुधन व कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे शोध लावले. सातत्याने प्रशिक्षण वर्ग घेत पुढील पिढीतील अभ्यासकांमध्ये संशोधनाची आवड रुजवली. त्यांच्याच प्रेरणेने हे अभ्यासक संशोधन क्षेत्रात कार्यरत राहून शेतकऱ्यांना नवी दिशा देतील.




























































